नांदेड - तरुणाने प्रेम भंग झाल्याच्या कारणावरून तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास शारदानगरातील झेंडा चौक परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीस घटनास्थळीच ताब्यात घेतले असून ही घटना प्रेमभंगातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Aryan Khan Case -आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट
भरदिवसा घरात घुसून केली हत्या
तरुणी शारदा नगरातील झेंडा चौक परिसरातील अॅड. हरदडकर यांच्या घरात भाड्याने राहत होती. तरुणी व आरोपी सुरेश देविदास शेंडगे (वय २६ रा. पांगरी) या दोघांचे काही वर्षांपासून प्रेम प्रकरण असल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली. परंतु, काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसल्याने दोघेही दुरावले होते. या कारणावरून आरोपी सुरेश शेंडगे याने तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून आज दुपारी १२.१५ च्या सुमारास घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. त्यामुळे, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली.
आरोपी घेतला ताब्यात
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, विमानतळ ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सपोनि अनलदास गिते, कर्मचारी दारासिंग राठोड, बाबा गजभारे, अशोक कुरुळेकर, दत्ता गंगावरे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी घटनास्थळावरून बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच त्यास ताब्यात घेतले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले. या प्रकरणी विमानतळ पोलिसात पुढील कारवाई सुरू होती. कुटुंबातील एकुलत्या एक मुलीची हत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - Aryan Khan Case : प्रभाकर साईलच्या दाव्यावर एनसीबीने दिले 'हे' स्पष्टीकरण