नांदेड - महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करणारे सहा तराफे जाळून नष्ट केले आहेत. यामुळे रेती माफियांना चांगला दणका बसला आहे.
नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव (महादेव) आणि सांगवी परिसरातील आसना नदीच्या पात्रात उपविभागीय अधिकारी नांदेड, अर्धापूरचे तहसीलदार सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ मार्चला बुधवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त -
नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मंडळ अधिकारी संजय खिलारे, तलाठी बी.एन.मोरे, एन.आर.गाढे, व्हि.एच.मोटे, सह.पो.उपनिरीक्षक डि.व्हि.केदार, ईश्वर लांडगे अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
हेही वाचा - 'सुरुवातीला तर हा पुण्याचाच अर्थसंकल्प असल्यासारखं वाटलं'
आसना नदी परिसरामध्ये अवैध वाळू उत्खननाची पाहणी करण्यासाठी महसूलचे पथक गेले असता नदी पात्रात अनेक ठिकाणी रेती उपसा करणारे तराफे पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्वतः पाण्यात जाऊन तराफे एकत्र केली. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे सहा तराफे जाळून त्यांचे मनसुबे हाणून पाडले. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीमुळे अवैध वाळू उपसा करणार्या वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस पथक आणि महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या या कार्यवाहीचे जनतेतून स्वागत होत आहे.