नांदेड - परीक्षा केंद्रावर पत्नीस सोडण्यास आलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. पत्नीला परीक्षेस येण्यासाठी ५ मिनिटे उशीर झाल्याने तिला परिक्षेस बसू दिले नव्हते, यामुळे पतीस ह्रदयविकाराचा झटका आला.
गजानन देशमुख (वय ३३ रा. कुरुंदा) असे मृताचे नाव आहे. देशमुख हे आपल्या पत्नीला कृषी सहाय्यकाची परीक्षा देण्यासाठी नांदेड येथील होरायझन इंग्रजी शाळेत घेऊन गेले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. गजानन देशमुख यांची पत्नी त्यांच्याकडे जवळ आल्यानंतर गजाननने छातीत दुखत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या पत्नीने ग्रामस्थांना आवाज दिला. ग्रामस्थांच्या मदतीने पतीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गजानन देशमुख यांचा मृत्यू झाला.
संतप्त नातेवाईकांनी मृतदेह उचलून परिक्षा केंद्र परिसरात ठेवला. घटनास्थळी नांदेड पोलिसांनी धाव घेतली. मात्र, जोपर्यंत शिक्षकांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. या प्रकाराने वातावरण चांगलेच तापले होते. उशिरापर्यंत पोलीस व शिक्षक मृताच्या नातेवाईकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आत्तापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, वेळेचे बंधन पाळणे आता शिक्षकाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.