नांदेड - एकीकडे मुंबईसारख्या शहरात झगमगाटात 'नाईट लाईफ' सुरू करायला सरकारला सुचते. पण, रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्याची नेमकी 'नाईट लाईफ' कशी चालत असेल पहायला कुणालाच वेळ नाही. अनेक संकटाना तोंड देत शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे ही नाईट लाईफ आम्हाला नको, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या राजधानीत नाईट लाईफ सुरू करण्यात आहे. रात्रीला काही मिनिटेही वेळ गेली तरी सर्व यंत्रणा जागी होते. पण, शेतशिवारात केवळ शेतकऱ्यांना दहा तासच वीज मिळते. पण, बिल चोवीस तासाचे घेतले जाते. तीही वीज देताना दिवसा भारनियमन ठेवले जाते आणि रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होतो. यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड देत शिवारातच रात्र काढावी लागत आहे. प्रचंड थंडी, रानडुकराचा व वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. शेतात अनेक मजूर कुटुंबे वास्तव्यास असतात. त्यांनाही अनेकवेळा रात्र अंधारात काढावी लागते.
हेही वाचा - सराफाच्या सतर्कतेमुळे चोरीचा तपास; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पुढाकार घेऊ म्हटले आहे. पण, प्रत्यक्षात येणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. वीजवितरण कंपनीच्या वतीने महिनाभराचे वेळापत्रक दिले जाते. त्यानुसार जानेवारी महिन्यात हे पहिल्या आठवड्यात रात्री नऊ ते सकाळी आठ, दुसऱ्या आठवड्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ तर तिसऱ्या आठवड्यात रात्री बारा ते सकाळी दहा, अशा पद्धतीचे विचित्र पत्रक असते. तेही वेळापत्रक वेळोवेळी बदलत असते. रात्रीच्या वेळी वीज दिली तरी त्यात अनेक अडचणी असतात. त्या म्हणजे अनेकवेळा लाईट जाते त्यावेळी कुठलाही वीज कर्मचारी उपस्थित नसतो. पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांनाच डीपीवर जाऊन लाईन टाकणे, फ्यूज टाकणे व दुरुस्ती करणे ही कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात.
हेही वाचा - नांदेडमध्ये कट प्रॅक्टीससाठी रुग्णांची हेळसांड, दोन डॉक्टरांमधील वाद पोहचला पोलीस ठाण्यात
जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज आणि तीही मोफत मिळते. जिल्ह्यात त्याच्या उलट परिस्थिती आहे. आमच्याकडून बिल घ्या, पण आम्हाला चोवीस तास वीज तरी द्या. किमान दिवसा तरी वीज द्या, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
हेही वाचा - जिल्हा नियोजन समितीच्या ३१५ कोटीच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्र्याची मंजुरी