नांदेड : मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केले. यामुळे हा घातपात असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली. याच संशयाने पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासात पित्यानेच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी पित्याला 10 ऑगस्टला अटक केली आहे.
काय आहे घटना : मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आई-वडिलांनी ग्रामस्थांना दिली. मुलगी मानसिक दबावात होती तिने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बतावणी आई-वडिलांकडून करण्यात आली होती. परंतु मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केल्यामुळे अनेकांना घातपाताचा संशय आला. संशयामुळे पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
ऑनर किलिंग : मुक्रमाबाद पोलिसांना एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करत मृत मुलीच्या वडिलांना अटक केली. त्यानंतर माध्यमांना पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती दिली. मृत मुलीचे आत्याच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. तिने आई-वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरला होता. मात्र मुलगा नशा करत असल्याने मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला. मुलीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या डोक्यातून प्रेम बाहेर पडले नाही. वारंवार समजावूनही मुलीने ऐकले नाही. याचा राग मनात धरुन वडिलांनी 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलीच्या मानेवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर शेतात मुलीचा मृतदेह जाळला.
आत्महत्येचा बनाव आणि तपास : मृत मुलीच्या आई-वडिलांनी गावकऱ्यांना मुलीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती दिली होती. परंतु हा घातपात असल्याचा संशय असल्याने पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी गावातील नातेवाईकांना याचा जाब विचारला तर अनेकांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांना हत्या झाली असल्याचा संशय होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपास पथकाने मुलीचा मृतदेह जेथे जाळला होता. तेथील काही नमुने घेतले. मुलीचे हाडे प्रयोगशाळेत पाठवली. त्यानंतर मुक्रमाबाद पोलिसांनी या घटनेबाबत अनेक गोपनीय जबाब नोंदवले. गावातील काही लोकांची पुन्हा चौकशी करत जबाब नोंदवले गेले.
आईला दिली होती धमकी : पोलिसांनी मुलीच्या आईला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी आईची चौकशी केल्यानंतर आईने सर्व सत्य पोलिसांना सांगितले. आपल्यालाही जीवे मारण्याची धमकी मुलीच्या वडिलांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करत आहेत.
खुनाचे पुरावे मिटवले : मुलीच्या प्रेमसंबंधाची बाब कळल्यानंतर मुलीच्या वडिलांनी विरोध केला. तरीही मुलीने नातेवाईकातील मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. याचाच राग मनात धरुन वडिलांनी राहत्या घरी कोयत्याने मुलीच्या मानेवर आणि हातावर वार केले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. त्यानंतर घरातील रक्ताचे डाग पाण्याने धुतले. हत्येसाठी वापरलेला कोयता ऊसाच्या शेतात फेकून दिला. ही बाब कोणाला सांगितली तर तुलाही मारुन टाकेन, अशी धमकी मुलीच्या आईला आरोपीने दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी माधव पवार, बब्रुवान लुंगारे, शौकत ताहेर या तपास पथकाने ऑनर किलिंगचा प्रकार समोर आणला.
हेही वाचा-