नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात खासदारांनी नांदेड-हिंगोलीचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. तसेच काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे पालकमंत्री पद द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली आहे. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे असल्याने कामे होत नसल्याचा आरोप खासदारांनी केला.
अशोक चव्हाण यांच्या विषयी नाराजीचा सूर
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी नाराजीचा सूर लावला.
सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित
आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 30-30-30 च्या फार्म्युल्यानुसार सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही. नांदेड जिल्ह्यात याबाबतीत नाराजी आहे. जिल्हा विकास आराखड्याचे नियोजन करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. निधीचे वाटप करताना देखील योग्य वाटा मिळत नाही. तसेच शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. खरे तर जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त केले पाहिजेत. परंतु, आमचे केवळ दोन सदस्य आहेत. एकूणच आघाडीच्या घटकपक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम करण्याची गरज असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.