नांदेड - शहरातील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री. हजूर साहिब येथे पारंपरिक दसरा हल्ला-महल्ला सण मंगळवारी साजरा होणार आहे. यासाठी नांदेडनगरी सज्ज झाली आहे. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी निहंगांचे सशस्त्र दल शहरात पोहोचले आहे.
शहरातील गुरुद्वाऱ्यात दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दसरा सणानिमित्त गुरुद्वाऱ्यात श्री. दशम गुरुग्रंथ साहेब अंतर्गत श्री. चंडी पाठाचे पठन व समापन करण्यात येते. तसेच गाभाऱ्यातील ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करण्यात येते. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गुरुद्वारा सचखंड येथून दशहरा हल्ला मोहल्ला ही पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत निशानसाहेब, किर्तनकार जत्थे, भजन मंडळी, बँड पथक, घोडे आणि गतका जत्थे सहभागी होणार आहेत.
तसेच पंजाबहून आलेले विशेष दल या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजता महावीर चौक येथील हल्ला बोल चौकातून पारंपरिकपणे हल्ला-महल्लाची अरदास होईल. हल्ला-महल्ला मिरवणुकीसाठी देश विदेशातून एक लाखाहून अधिक भाविक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. गुरुद्वारा बोर्डातर्फे दसरा सणाची व्यापक तयारी करण्यात आली आहे. यासाठी बाबा बिधिचंदजी दल, तरना दल, शिरोमणी पंथ अकाली बुड्डा दलासह ६ दलांचे नांदेडमध्ये आगमन झाले आहे. गुरुद्वारा शीख छावणी, नागिनाघाट, बंदाघाट आणि गुरुद्वारा माता साहेब येथे दलातील सेवेकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा- हदगाव विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेतील बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात आनंद