नांदेड - नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ परिसरात पोलीस कर्मचारी नितीन केंद्रे याने एका विद्यार्थींनीचा रस्ता अडवून तिची छेड काढत विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीविरुद्ध नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस कर्मचारी केंद्रे यास अटक झाली होती. आज पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नितीन केंद्रे यास निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेची स्वच्छता मोहीम
विद्यापीठ परिसरातून एक विद्यार्थीनी शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असताना शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नितीन केंद्रेने विद्यार्थिनीचा रस्ता अडवून तिची छेड काढत, विनयभंग केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर काल रात्री उशिरा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी नितीन केंद्रे यास अटक करण्यात आली होती. रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी केंद्रे यास निलंबित करण्याची मागणी जनतेतून होत होती. यानंतर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घटनेची गंभीरपणे दखल घेत नितीन केंद्रे यास तात्काळ निलंबित केले आहे.