नांदेड - कोरोनाच्या लढ्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या निधीतून भरीव योगदान दिल्याने या संकटाच्या काळात व्हेंटिलेटरची असलेली गरज काही प्रमाणात भागणार आहे. तसेच या निधीतून जवळपास १५ ते २० रुग्णवाहिकाही जिल्ह्याला मिळणार असल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. कोरोनासाठी प्रत्येक आमदाराने त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या आर्थिक सहयोगामुळे तब्बल ४ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले असून या एकत्रित निधीतून व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, पीपीई किट तसेच मास्कची मोठी रसद जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मिळणार असून महत्वाचे म्हणजे व्हेंटिलेटरची गरज काही प्रमाणात भागली जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच सरकारी यंत्रणेला नेहमीच्या कामासाठी लागणारा निधी आता पुरेसा मिळणार नाही. शासनानेही हात आखडता घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर निधी निर्माण करण्यासाठी प्रशासनाची चांगली कसोटी लागणार आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या एकूण निधीतील ३० टक्के निधी केवळ आरोग्य विषयक सुविधेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदेडला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय यांच्यासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे. शहरात महानगरपालिकेच्या १३ आरोग्य केंद्रात फक्त बाह्य रुग्णसेवा उपलब्ध आहे. याशिवाय महत्वाच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे कार्यरत आहेत. शासन, महानगरपालिका व जिल्हा परिषद अशा तीन पातळीवर हा निधी खर्च केला जातो.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत १५ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला असून त्यातून कोरोना उपाययोजनेसाठी लागणाऱ्या साधनांवर खर्च केला जाणार आहे. हा निधी पुरेसा ठरणार नाही, हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून २० लाख ते ५० लाख याप्रमाणे पावणेपाच कोटी रुपयांचा निधी आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी दिला आहे. यातून त्या-त्या आमदारांच्या मतदारसंघात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पीपीई किट, एन-९५ मास्क तसेच व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्याला किमान एक व्हेंटिलेटर व एक रुग्णवाहिका दिली जाणार असून मोठ्या तालुक्यांना त्यापेक्षा अधिक साधने देण्याचा विचार सुरू आहे. नांदेड महापालिका क्षेत्रात तीन रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्याचा विचार आमदारांनी केल्यामुळे ही सेवा आणखी बळकट होणार आहे.