नांदेड - मुलगी शिकली प्रगती झाली, या उक्तीला साजेसं काम नांदेड जिल्ह्यातील बनचिंचोली गावच्या चार बहिणींनी करून दाखवले. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. कुटुंबाचा आधार असलेला आपला 'बाप' दुसऱ्याच्या वाहनावर राबतो. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी तो आपल्या खांद्यावर घेतो. त्या खांद्याला चार बहिणींनी आपल्या खांद्याचा आधार दिला आहे. या चार बहिणींनी स्वतःच्या शेतात घाम गाळत शेतीतून जणू मोती पिकविले आणि आपल्या बापाला लाखो रुपयांचा मालक करून पंचक्रोशीत नाव कमवून दिले आहे. यावर ईटीव्ही भारतचा विशेष रीपोर्ट...
गावातील सर्व अर्थकारण शेतीवर-जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील बनचिंचोली हे अवघ्या साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. संपूर्ण गावचे अर्थकारण हे शेती भोवती अवलंबून असलेले. या गावातील अनेक शेतकरी कुटुंबापैकी एक असलेले कुटुंब पौळ यांच आहे. पिढीजात असलेली नऊ एकर शेती जुन्या वळणाने कसता कसता गणेश पऊळ यांच्या नाकीनऊ आले. शेतीत काही परवडत नाही, असा समज करुन घेत गणेश पऊळ यांनी वाहनचालकांची खासगी नोकरी करून कसाबसा संसार सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची होणारी आर्थिक ओढाताण त्यांच्या दोन मुली पुजा आणि धनश्री जवळून पाहत राहील्या. बालपणानंतर या दोघींनी शेतीतूनच घराला हातभार लावण्याचा निश्चय केला. आठवीपर्यंत शिक्षण घेवून त्यांनी पुढे शेतीलाच शाळेचे स्वरुप दिले. वय वर्षे 17 आणि 19 हे तसे अनेक स्वप्नांना घेवून आपल्या भावविश्वांना रंगविण्याचे असते. या दोघींनी हे स्वप्न शेतीभोवती रंगवून चांगले उत्पादन हाती घेण्याचा ध्यास बाळगला.
सर्व कामे शिकून घेतली-घरचीच शेती असल्यामूळे पेरणीपासून वखरणीपर्यंत नांगरणी पासून तण काढेपर्यंत सारी कामे त्यांनी शिकून घेतली होती. यात एक नैपुण्य जे लागते ते त्यांनी स्वत: शेतात राबवून हाती घेतले. त्यांनी त्यांच्याच वडीलांकडून अर्थात गणेश पऊळ यांचाकडून हे कसब घेतले.
पऊळ यांना चार मुली अन एक मुलगा-पऊळ यांना पाच अपत्य असून चार मुली व एक मुलगा आहे. त्यांची पत्नी मिळून सात जणांचा परिवार आहे. या सात सदस्यांची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची आहे.
मजूरी न देता स्वतःच केले कष्ट-परिस्थिती बेताचीच असल्याने लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता. पूजा व धनश्री यांनी शेतीकडे वळणे अधिक सुरक्षित मानले. मुलीचे हे धाडस पाहून कुटुंबातील इतर सदस्यही शेतीकडे वळले. घरचेच मनुष्यबळ शेतीसाठी उपलब्ध झाल्यामूळे त्यांचा मजुरीसाठी द्यावा लागणारा खर्च वाचला.
विविध पिकांची केली लागवड-गणेश पऊळ यांच्या शेतीपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावरुन पैनगंगा नदी वाहत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष लाभ त्यांना झाला. या परिसरात विशेषत: त्यांच्या शेतात ट्युबवेलला चांगले पाणी लागले. पाण्याची उपलब्धता झाल्यामूळे पुजा व धनश्री यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊस, कापूस, सोयाबिन, हरभरा, टरबूज, मिर्ची या पिकाचे प्राधान्याने उत्पादन घेण्याला पसंती दिली. वडिलांचा उपलब्ध असलेला वेळ घेत त्यांनी या पिकांचे नियोजन स्वत: करुन दाखविले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर-उपलब्ध असलेले पाणी सर्व पिकांना व विशेषत: नोव्हेंबर ते जुलैपर्यंत पुरावे यासाठी ठिंबक सिंचनचा पर्याय त्यांनी निवडला. या तंत्रज्ञानामूळे पिकांना आवश्यक तेव्हा ताण देणे हेही शक्य झाले. पाण्याचा या आधुनिक व्यवस्थापनासमवेत त्यांनी पारंपारिक पेरणीला छेद देत सरीवंरबा पध्दतीचा वापर करुन मल्चिंग पध्दतीचा वापर केला. पेरणीला जे बियाणे निवडले ते अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून नंतर दीड इंच जमिनीत पेरले.
हवामानाचा व वातावरणाचा अभ्यास करुन पिकांची लागवड-इतर पिके घेतांना हवामानाचा व वातावरणाचा अभ्यास करुन पिकांची लागवड करण्याचे कसब या बहिणींनी आत्मसात केले. पिकावर किड, रोग पसरु नये म्हणून फवारणी करण्यासाठी निमअर्क, निमोल यांचा त्यांनी प्राधान्याने वापर केला. जास्तीत जास्त सेंद्रीय पध्दतीचा अवलंब करुन नवनीवन तंत्रज्ञान शिकून शेतात नवीन उपक्रम राबविणे या भगिंनीचा हातखंडा बनला आहे. दशपर्णी, अर्क, जीवामृत स्वत: तयार करुन सेंद्रीय जिवाणू ,गांडूळ खत तयार करुन निसर्ग पुरक शेतीला आता त्यांनी प्राधान्य दिले आहे.
जे विकेल तेच पिकेल या धोरणाला केले जवळ-पिकांची लागवड करताना प्रामुख्याने त्यांनी आता जे विकेल तेच पिकेल या धोरणाला जवळ केल्यामूळे शेती उत्पादनाला बाजारपेठेची जास्त अडचण त्यांच्या पुढे निर्माण झाली नाही. पारंपारिक पिकाला छेद देत त्यंनी वर्षातून दोन वेळेस टरबूजचे पिक घेतले. 65 दिवसांचे हे पिक असल्यामूळे बाजारात ज्या महिन्यामध्ये याला मागणी असते तो काळ निवडला. त्यांनी टरबूज पिक व मल्चिंगसाठी शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. टरबूजची बाजारपेठ लक्षात घेवून त्यांनी हा शेतमाल विक्री करण्यासाठी नांदेड, हैद्राबाद, मुंबई, दिल्ली हरियाणा, पंजाब येथील बाजारपेठा निवडल्या.
शेती मन लावून व नियोजनबध्द केल्यास शेती शंभर टक्के परवडतेच-पुजा पऊळ यांना शेती फायद्याची आहे की तोटयाची असे विचारले असता, वर्षाला पर एकरी एक लाख रुपये उरतात. भाव चांगला मिळाला तर 15 लाख रुपयेही मिळतात, असे तीने स्पष्ट केले. त्यामूळे शेती स्वत: लक्ष देवून, जीव ओतून केल्यास कधीही तोटा होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. शेती मन लावून व नियोजनबध्द केल्यास शेती शंभर टक्के परवडतेच. यावर बाजाराचा अभ्यास करुनच बाजारात काय विकते तेच पिकविले पाहिजे, असे तीने सांगितले.
नऊ एकर जमिनीत विविध पिकांचे विक्रमी उत्पादन-एकूण जमीन 9 एकर आहे. एक एकरात ऊसाचे सरासरी 95 टन काढले. हरभरा एकरी 15 क्विंटल तसेच टोमॅटो, वांग, मिरची, टरबूज या पिकांचेही विक्रमी उत्पादन घेतले.
बहिणींचा कृषी विभागाकडून गौरव-शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन किंवा मधुमक्षीकापालन असे जोड पुरक व्यवसाय करायला पाहिजे,असेही तीचे म्हणणे आहे. त्यामूळे शेती अधिक फायदेशिर ठरु शकते. यासाठी शासनाच्या योजनांचा फायदा घेतल्यास जास्त नफा मिळतो. या कुटूंबाने घरच्या दुधासाठी गाय व म्हशी विकत घेतलेल्या आहेत. या बहिणींना शेतीच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी कृषी विभागाने गौरविले आहे. आजवर धनश्रीची मला शेती करताना खूप खंबीर साथ राहायची . तिचे नुकतेच लग्न झाल्यामूळे आता मी माझ्या शाळेतील बहिणीला सोबत घेवून शेती करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे पुजाने सांगितले. आधुनिक शेतीसाठी या दोघींना पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा- विशेष: दिव्यांग असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर केला लोहगड
हेही वाचा- विशेष बातमी : टोमॅटोच्या पिकांमधून दीड एकरमध्ये दोन महिन्यात घेतले पाच लाख रुपयांचे उत्पादन