नांदेड - मंगळवारी जिल्ह्यातील उमरी तालुक्यात चार कोरोना रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. तर, 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 51 रुग्णांवर विविध केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 137वर गेली आहे. आतापर्यंत एकूण 79 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील प्रयोगशाळेकडून मंगळवार, दि. 26 मे रोजी 122 नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर, चार अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्वच्या सर्व अहवाल हे उमरी तालुक्यातील आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 133 वरून आता 137 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमध्ये सात वर्षांचा मुलगा, 9 व 14 वर्षांची मुलगी व 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर उमरी येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
16 रुग्ण बरे
आरोग्य यंत्रणेकडून मंगळवार, दि. 26 मे रोजी एनआरआय यात्री निवास येथील उपचार घेणार्या 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 137 झाली आहे. तर, 51 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच, 52 व 55 वय वर्षे असलेल्या दोन महिलांची प्रकृती नाजूक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंट भोसीकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती (26 मे)
• आतापर्यंत एकूण संशयित - 3452
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या - 3107
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1598
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 257
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 61
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 3042
• एकूण नमुने तपासणी- 3460
• एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 137
• पैकी निगेटीव्ह - 2941
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 229
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 135
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 79
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण 1 लाख 35 हजार 173 प्रवासी आहेत. त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.