नांदेड : नांदेडमध्ये चार कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 30 एप्रिल रोजी लंगरसाहिबच्या 97 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या होत्या. त्यातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. मात्र, तपासणीला नमुने देऊन हे २० ही रुग्ण गायब झाले होते.
पोलिसांनी मोठी शोधाशोध करत यातील 16 जणांना ताब्यात घेतल आहे. मात्र, यातील उर्वरित चौघांची केवळ नावेच उपलब्ध आहेत. त्यामुळे या चौघांचा अद्याप शोध लागत नाही. या मंडळींचे तपासणीसाठी नमुने घेतल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, रुग्णालयात नेणे तर सोडाच पण या लोकांचे साधे पत्ते, संपर्क नंबर देखील घेण्याची तसदी आरोग्य विभागाने घेतलेली नाही.
एकीकडे कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार प्रचंड प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेला याचे गांभीर्य नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर, या प्रकारामुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करावे अशी मागणीही आता पुढे येत आहे.