नांदेड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आज अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली. तसेच, जो पक्ष आमदार करेल त्याच पक्षात प्रवेश करू, अशी माहिती त्यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली.
बापूसाहेब गोरठेकर यांची भाजपाशी जवळीकता वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा उघड प्रचारही केला. त्यानंतर भाजपाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये बापूसाहेब गोरठेकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा आधीपासूनच होत होती.
बापूसाहेब गोरठेकर यांनी नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांची बैठक घेऊन, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी आज राष्ट्रवादी पक्ष सोडत असून जो पक्ष उमेदवारी देईल, त्या संदर्भाने विचार करेल. नांदेड जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असे देखील गोरठेकरांनी स्पष्ट केले.
गेली अनेक वर्ष आघाडीचा धर्म पाळत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. मात्र, पक्षातील राहू-केतूमुळे पक्ष अडचणीत येऊ लागला. यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे कुठल्या पक्षात जायचे आणि कुठून निवडणूक लढवायची याबाबत निर्णय घेतला नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी येथे व्यक्त केली.
यावेळी, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यात नांदेडचे दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार सामील असल्याचा आरोप गोरठेकरांनी केला. कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट, त्यांच्यावर होत असलेले अन्याय, आघाडीचा धर्म न पाळता सूडबुध्दीचे झालेले राजकारण यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीमधील सर्व मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यातच आता गोरठेकरांचेही जोडले गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.