नांदेड - लॉकडाऊनमध्ये मुरजलेली फुलांचे मळे आता डोलू लागली आहेत. रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ गतवर्षी आली. अनेक शेतकऱ्यांनी फुल मळ्यावर नांगर फिरविला. लॉकडाऊन शिथिल होताच शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने फुलांची लागवड केली. पुन्हा एकदा फुल मळे डोलू लागली आहेत. त्यातच पून्हा एकदा लॉकडाऊनच्या धास्तीने पुन्हा एकदा फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
एक एकरमध्ये केली बिजली फुलांची लागवड
जिल्ह्यातील पार्डी (म.) ता.अर्धापूर येथील शेतकरी चंद्रकांत माधवराव कवडे यांनी एक एकर क्षेत्रात बिजली फुलांची लागवड केली आहे. ती आता पूर्ण बहरली असून नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. या फुलासोबतच शेवंती, झेंडू या फुलांचीही लागवड केली आहे.
मुदखेड व अर्धापुर तालुक्यात असते मोठी लागवड
जिल्ह्यातील मुदखेडसह अर्धापूर तालुक्यात विविध फुलांची मोठी लागवड असते. बहुतांशी शेतकरी गुलाब, शेवंती, मोगरा, बिजली, काकडा, झेंडू फूल शेतीबरोबर फळ व भाजीपाला शेती करतात. या भागातील फुलांची निर्यात दुसऱ्या राज्यासह नांदेड, पुणे, मुंबई, नागपूर यासह अन्य मोठ्या शहरात पाठवली जातात. मात्र लॉकडाऊनमध्ये फुलांची मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुल शेती करणे बंद केली.
पार्डी (म.) येथील शेतकरी चंद्रकांत कवडे यांनी फुल शेती मोडली नाही. त्यांनी पुन्हा बिजली फुलांची लागवड केली आहे. ती फुले आता तोडणीसाठी येत आहेत. त्यात सार्वजनिक व लग्न समारंभाच्या कार्यक्रमावरही बंधन घालण्यात आली आहेत. किमान दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते. आतातर काही वेळा मार्केट घेऊन गेल्यानंतर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत आहे. पुन्हा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नेमकीच सुरूवात अन शेवटही
आताच फुलांची मागणी वाढू लागली होती. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले होते. फुलांची मागणी वाढू लागली होती. यामुळे फुल उत्पादकांच्या अडचणी काही अंशी दूर होऊ लागल्या होत्या. ही नेमकीच सुरुवात अन शेवटही हेच असल्यामुळे शेतकरी पून्हा एकदा अडचणीत सापडला आहे.