नांदेड - जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात गुरुवारी मध्यरात्री मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने परिसरातील लेंडी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
महसूल विभागाच्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यात मागील २४ तासांत ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुक्रमाबादला सतत दोन दिवस (बुधवार, गुरुवार) पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कर्नाटकमधील होकर्णा, औराद परिसरात मोठा पाऊस झाल्याने मुक्रमाबादनजीकचा नाला ओसंडून वाहत असल्याने देगलूर मार्गावरील वाहतूक २ तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या. तसेच उदगीर मार्गावरील धडकनाळ येथील नाल्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील वाहतूकही बराच वेळ ठप्प होती.
दरम्यान, या पावसामुळे मुक्रमाबादसह परिसरातील बळीराजा सुखावला असून यावर्षी या भागातील पेरण्या मृग नक्षत्रात उरकतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.