नांदेड - शंकरनगर येथील विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. यानंतर आरोपी प्राचार्य धनंजय शिवराज शेळके (५१) आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदिप धोंडीबा पाटील (४६) हे फरार झाले होते. परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथून दोन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रामतिर्थ पोलिसांच्या पथकाला यश आले आले आहे. त्यांना बिलोलीच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी त्यांची पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.
या अत्याचार प्रकरणातील रामतिर्थ पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची चाहूल लागताच सर्वच आरोपी फरार झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी आठ पथकांची निर्मिती केली होती. २२ जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सय्यद रसूल यास अटक केली. यानंतर प्रदिप पाटील आणि धनंजय शेळके हे पुर्णा तालुक्यात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त आश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्यासह पोलीस पथक वेगवेगळ्या वेशात पूर्णेकडे रवाना झाले होते. याप्रकारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता बिलोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने प्राचार्यसह मुख्याध्यापकास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पुढील तपास सुरू आहे.