नांदेड - उमरी तालुक्यातील एरंडल-येंडाळा, महाटी, कौडगाव येथील वाळू घाटावर क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करण्यात आला होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशावरुन विशेष पथकाने या वाळू घाटांची ईटीएसने मोजणी केली. त्यात तब्बल 12 कोटींची नियमबाह्य वाळू उपसा केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे मंडळ अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी या तिन्ही वाळू घाटाच्या लिलावधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
उमरी तालुक्यातील महाटी या वाळू घाटाचा लिलाव झाला असून हा घाट सोलापूर जिल्ह्यातील दहिगाव (ता.माळशिरस) विष्णू शंकर नारणवार यांना सुटला आहे. त्यांना २८७१ ब्रास वाळू उत्खननाची परवानगी असताना या घाटावर क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करण्यात आला आहे. ईटीएसद्वारे मोजणी केल्यानंतर संबंधितांनी ६३ हजार ३६६ ब्रास इतके जास्तीचे उत्खनन केल्याचे सिद्ध झाले आहे.त्यानुसार त्यांनी २ कोटी ६५ लाख ७९ हजार ७२० रुपयांची वाळू चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एरंडल-येंडाळा हा वाळू घाट मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील ओंकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे यांना सुटला आहे. त्यांना घाटावर २८६२ ब्रास वाळू काढण्याची परवानगी असताना त्यांनी बेकायदेशीररीत्या ११ हजार ९५० ब्रास अधिक वाळू उपसा केला आहे. त्यामुळे त्यांनी ४ कोटी ९६ लाख ९४ हजार ३३९ रुपयांची वाळू चोरी केली आहे. कौडगाव हा घाट नायगावच्या लोकडेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दत्तात्रय बापूराव जाधव यांना सुटला होता. त्यांनी नियमानुसार दिलेल्या ३०९२ ब्रास वाळू ऐवजी १२ हजार ६१६ ब्रास अधिक वाळू उपसा केला आहे.त्यामुळे त्यांनी ५ कोटी २६ लाख ७३ हजार ४७० रुपयांची वाळू चोरी केली आहे.
ईटीएस मोजणीनंतर या तिन्ही वाळू लिलावधारकांनी एकूण १२ कोटी ९२ लाख ४७ हजार ५२९ रुपयांची वाळू चोरी केली आहे. आजही गोदाकाठावर हजारो ब्रास वाळू साठा करण्यात आला असून या भागात वाळूची शेती बहरली आहे. या तिन्ही वाळू घाटावरील वाळू लिलावधारकांनी त्यांना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उपसा केला आहे. शिवाय या वाळू लिलावधारकांनी अधिकचे उत्खनन केले असून ते नदीपात्रावरील भागात वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवले आहेत. या वाळू साठ्याचा महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. तसेच ईटीएस मोजणी होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर तिन्ही लिलावधारकांविरुद्ध मंडळ अधिकारी अर्जुन काशीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे करत आहेत.
या तिन्ही वाळू घाटांची आयुक्त कार्यालय औरंगाबाद, परभणी, उपविभागीय अधिकारी धर्माबाद, बिलोली, नायगाव, तहसीलदार उमरी यांनी पाहणी केली आहे. वाळू चोरी केल्याप्रकरणी व नियमांचे उल्लंघन करून पर्यावरणाचे नुकसान केल्यामुळे गोळेगाव विभागाचे मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी ही कारवाई केली आहे.