नांदेड - शासनाने लग्न समारंभ अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या कडक सूचना दिल्यामुळे साहजिकच अत्यंत साध्या पद्धतीने विवाह पार पाडत आहेत. यातही एका पोलीस दाम्पत्याने आपल्या विवाह समारंभाचा खर्च वाचल्यामुळे एका निराधार कुटुंबाला आधार देऊन एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
निमगाव (ता.अर्धापूर) येथे राहात असलेल्या अल्पभूधारक निराधार शेतकरी महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत देत नवविवाहित पोलीस दाम्पत्यकडून विवाहाच्या खर्चास फाटा देत निराधार कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत दिल्याने त्यांचे डोळे भरून आले. हा प्रसंग सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला यानिमित्त वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.
वधू आणि वर दोन्ही पोलीस खात्यात कार्यरत -
जिल्ह्यातील सावरगाव (ता.अर्धापूर) येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख छगन पाटील सांगोळे यांची बहिण सीमा ही मुंबई दादर येथे पोलीस प्रशासनात कार्यरत आहे. तिचा विवाह कुंभारवाडी ता.गेवराई जिल्हा बीड येथील धारावी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अंकुश जाधव यांच्याशी २२ एप्रिलला झाला.
अवाजवी खर्चाला फाटा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत अत्यंत कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. विवाहात अवाजवी खर्चाला फाटा देत अल्पभूधारक निराधार शेतकरी कुटुंबात अंकिताच्या लग्नास दिली आर्थिक मदत दिली.
घराला आग लागल्यामुळे आले होते कुटुंब उघड्यावर -
जिल्ह्यातील निमगाव (ता.अर्धापूर) येथील सुनिता व्यंकटी खटके यांच्या पतीचे आजारपणामुळे गेल्या आठ वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर दोन मुली व एक मुलगा अशा कुटूंबाचा भार सुनीता यांच्यावर आला. त्या रोज-मजुरी करून कुटुंबाचा घरखर्च चालवत व मुलगी अंकिताच्या लग्नासाठी बचत केलेल्या पैशांमध्ये लग्नासाठी लागणारे साहित्य साड्या, भांडे, सोनं इतर साहित्य खरेदी करून ठेवले होते. २६ नोव्हेंबरच्या रात्री अचानक आग लागल्याने घरातील कपडे, धान्य व इतर साहित्य जाळल्याने मोठे नुकसान झाले होते.
आर्थिक मदत करत जपली सामाजिक बांधिलकी -
वडिलांचे छत्र हरवलेल्या व आर्थिक परिस्थितीने खचलेल्या एका निराधार शेतकरी कन्येच्या विवाहास आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासत खऱ्या अर्थाने गरजवंतास मदत देत माणुसकीचे दर्शन झाले. याप्रसंगी मुलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू येत होते या ऋदयस्पर्शी प्रसंगाची सर्वत्र चर्चा होत असून ३० एप्रिलला अंकिताचा विवाह आहे. यासाठी आणखी दानशूर व्यक्तीने समोर येण्याची गरज आहे.
दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न -
दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न अंकिताच्या विवाह कार्यास मदत करून त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती दूर करण्याचा व दुःख वाटून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्याने दिली आहे.