नांदेड - हिंगोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या हनुमंत गोविंदराव शिरसाट यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शेख जाकीर शेख जकीर यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील कल्हाळी गावातील एका स्वातंत्र्य सैनिकाचे कोणतेही नातेसंबंध नसताना त्या स्वातंत्र्य सैनिकाचे आपण भाचा असल्याचे खोटे व बनावट प्रमाणपत्र त्याने तयार केले होते. तसेच या साहाय्याने शासकीय नोकरी मिळविली, असा आरोप त्यांच्यावर आहे.
गेल्या २६ वर्षांपासून आहेत सेवेत -
स्वातंत्र्य सैनिकाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या २६ वर्षांपासून शासकीय सेवेचा लाभ घेणारे शिरसाट हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी एका राजकीय पुढाऱ्याने देखील शिरसाठ यांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप घेतला होता.
शेख जाकीर गेले होते न्यायालयात -
सार्वजनिक बांधकाम विभागात चालणारे गैरप्रकार नवीन नाहीत. अनेकदा त्याची सार्वजनिक चर्चा होत असते. त्यात आता स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळविणाऱ्या शाखा अभियंता शिरसाट यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची होत आहे. सदरचे प्रकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून गाजत असले तरी, शासन दरबारी तसेच पोलीस विभागापर्यंत कुठेही दाद मिळत नसल्याचे पाहून शेख जाकीर यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.
हेही वाचा - नांदेडमध्ये २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी..!
भाचा असल्याचे दाखवले नाते -
शिरसाट हे सन १९९४पासून शासकीय सेवेत काम करत असले तरी, त्यांनी खोटे व बनावट स्वातंत्र्य सैनिकाच्या प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांनी केलेला खटाटोप समोर आला आहे. कल्हाळी या गावातील स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड यांचे रक्ताचे नातेसंबंध दाखवून त्यांचा भाचा असल्याचे नोकरी मिळवितानाच्या नामनिर्देशनपत्रात दाखविले. मुळात स्वातंत्र्य सेनानी रामा दुधवाड व शिरसाट हे वेगवेगळ्या समाजाचे असल्याने त्यांचे नातेसंबंध कसे होऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करून बनावट कागदपत्राच्या आधारे शिरसाट यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे नातेवाईक असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी पेठवडजच्या मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून शिरसाट यांच्या स्वातंत्र्यसैनिक नामनिर्देशन पत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तरी, या प्रकरणातील चौकशी सुरू असून, प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी खोटे नामनिर्देशनपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करावा. यासाठी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, गुन्हाही दाखल होत नाही आणि चौकशीही होत नसल्याचे पाहून शेख जाकीर यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर, न्यायालयाच्या आदेशानुसार शाखा अभियंता हुनुमंत शिरसाट यांच्याविरुद्ध भाग्यगनर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच; एकाच दिवशी १ हजार २९१ नवे कोरोना बाधित