नांदेड - शनिवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १८ रुग्णांमध्ये तब्बल १५ तरुणांचा समावेश आहे. ३ वयस्कर महिलांचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने काढलेल्या प्रेस नोटमधून ही बाब पुढे आली आहे. हे १५ तरुण १८ ते २७ वयोगटातील आहेत. यामध्ये १८, १९, २० आणि २३ वयाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ आणि १५, १६, १७, २१, २२, २६ आणि २७ वयाचा प्रत्येकी एका तरुणाचा समावेश आहे. यापूर्वीही शहरात काही तरुणांना कोरोना झाल्याचे समोर आले. मात्र, शनिवारच्या १८ पैकी तब्बल १५ तरुणांना या आजाराने घेरल्याचे समोर आले.
कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो. हा समजही या निमित्ताने खोटा ठरला आहे. बाहेर पडणाऱ्या तरुण मुलांनी देखील अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती (16 मे 2020 वेळ 05.00 पर्यंत)
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 2500
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2255
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 932
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 214
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -95
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2160
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 118
• एकुण नमुने तपासणी- 2526
• एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- 84
• पैकी निगेटिव्ह - 2000
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 380
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 47
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाखांपेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.