नांदेड- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. तर या अपघातामध्ये मृत व्यक्तीची पत्नी व दोन मुले जखमी झाले आहेत. ही घटना शहरापासून जवळच असलेल्या आनंदसागर मंगल कार्यालय येथे गुरुवारी दुपारी घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात असलेल्या फुलसांगवी येथील शेख मुस्तफा शेख शरीफ ( वय ४० ) हे आपली पत्नी व तीन मुलांना घेऊन दुचाकी ( एमएच २६ एएल - ७८७ ) वरून नांदेडकडे येत होते. यावेळी नांदेडहून अर्धापूरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत शेख मुस्तफा ( वय ४० ) आणि त्यांचा मुलगा शेख मुजेफ ( वय 8) हे गंभीर जखमी झाले. जखमींना येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. परंतु , रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेख मुस्तफा व शेख मुजेफ यांचा मृत्यू झाला. यात शेख मुस्तफा यांची पत्नी व दोन मुले किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस श्रीनिवास रामोड, कमलाकर जमदाडे, आबाजी खोमणे यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले. काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. ती सुरळीत करून जखमींना येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल केले गेले. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.