नांदेड - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःला पुन्हा एकदा शेतातच क्वारंटाईन केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला मुक्काम शेतात हलवला आहे. शेतकरी शेतातील कामेही उरकत आहेत. त्यातच गतवर्षीही अनेक कारखाने बंद असताना शेतातील कामांनी अनेकांना आधार दिला होता. यंदाही परिस्थिती वेगळी नसून बाजारपेठेतील काम बंद राहिले तरी शेतकरी मात्र मजुरांच्या हाताला काम देत आहेत.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाचे पुरस्कार
ग्रामीण भागात शेतीकामाचा मोठा आधार
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेक जणांना रोजगार मिळत नाही. मात्र, ग्रामीण भागातील मजुरांना शेतात रोजगार मिळत आहे, त्यामुळे शहरातून आलेले मजूर कोणी चालक, मिस्त्री, दुकानावर काम करणारे कारागीर शेतामध्ये राबताना दिसत आहेत. ज्यांना कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नाही त्यांना शेतीच रोजगार देत आहे.
शेतात सुरू आहेत उन्हाळी कामे
जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगाम पूर्वी मशागत, हळद काढणे, शिजवणे, वाळवणे यासह शेतातील कामे वेगाने सुरू आहेत. तसेच गहू, भुईमूग व उन्हाळी ज्वारी काढणीची कामेही सुरू आहेत. अत्यंत खुल्या आणि निरोगी वातावरणात शेतकरी येणाऱ्या हंगामाची तयारी करत आहे. त्यातही बाहेरच्या कुणालाही शेतात प्रवेश दिला जात नाही. इतकेच काय, तर शेतकरी शेतात काम करतानाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये कोरोना लसीबाबत गैरसमजुतीचा मुलामा, आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार नागरिकांनीच घेतली लस