नांदेड - शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीच्यावतीने निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. भोकर मतदारसंघात सर्वसामान्य मतदार व शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. युतीच्यावतीने संधी दिल्यास भोकर मतदारसंघात इतिहास घडवून लोकसभेची पुनरावृत्ती करू, असा विश्वास इंगोले यांनी व्यक्त केला. ते आज नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.
भोकर मतदारसंघातील मतदारांवर व शेतकऱ्यांवर माझा विश्वास आहे. चांगले काम करणार्यांना त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. या मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ असून कुणाच्या आमिषाला किंवा दबावाला बळी पडणारी नाही. याचा अनेक वेळा प्रत्यय आला आहे. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेस उमेदवारांविरोधात शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार हा पैसेवाला नसला, तरी इमानदार प्रामाणिक कार्य करणारा असावा, अशी सर्वसामान्य मतदारांची भूमिका दिसत असल्याचे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव कारखान्यांसह राज्यातील बलाढ्य कारखानदारांच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी लोकांनी लोकवर्गणी देऊन मला सहकार्य केले. त्यामुळे ही जनता पैसे घेणारी नसून वेळप्रसंगी कार्यकर्त्याला पैसे देणारी आहे. त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा लोकांवर दृढ विश्वास असल्याचे ते म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मदत केली. गेल्या लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेससोबत युती केल्यामुळे मी संघटनेचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांसाठी युतीच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा देऊन पूर्णवेळ ताकदीने काम केले. नांदेड व हिंगोली खासदाराच्या विजयात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे युतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मला संधी द्यावी, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना केली असल्याचे इंगोले म्हणाले.
गेल्या १० वर्षांपासून सतत शेती प्रश्नांवर आंदोलने केली. पत्रकारितेतून प्रश्न मांडले, ऊस एफआरपीचा राज्यव्यापी लढा यशस्वी लढला. तसेच अजूनही कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. महामार्ग मावेजा आंदोलन, दूधदरवाढ आंदोलन, पीक विमा मावेजासाठी आंदोलने, शेतकऱ्यांना बँका कर्जासाठी नकार देत असल्याने त्याविरोधात केलेली आंदोलने, पाणी, वीज, केळी कमिशन बंद, पिकांना हमीभाव, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी आंदोलने, असा सर्वसामान्यांसाठी संघर्षमय प्रवास केला आहे. त्यामुळे युतीचे वरिष्ठ नेते भोकर मतदार संघाची उमेदवारी देण्यासाठी माझा विचार करतील, असा विश्वास इंगोले यांनी व्यक्त केला आहे.