नांदेड - नियमित कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार किंवा २ वर्ष बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी सरकारकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. या निर्णयाचा संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने सरसकट २ लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करून महाराष्ट्रातील शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे बहुतांश शेतकर्यांचा सातबारा कोरा होईल. या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे इंगोले म्हणाले.
नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून प्रति हेक्टरी २५ हजार रूपये किंवा २ वर्षापर्यंत त्यांना बिनव्याजी कर्जपुवठा करावा अशी एखादी योजना आणणे गरजेचे आहे. जेणेकरुन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांवर अन्याय होणार नाही. म्हणून आपण याचा विचार करुन नियमित व्यवहार करणार्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकर योजना आणावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व चिंतामुक्तीच्या दृष्टीने प्रगतीपथावर जाण्यास सरकारच्या या योजनेचा मोठा लाभ होईल अशी अपेक्षा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली.