नांदेड - मराठवाड्यात रेल्वे प्रश्नांसंदर्भात संघर्ष करूनही अनेक प्रश्न तसेच रेंगाळत पडले आहेत. केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे सरू केली आहे. मात्र मरावाड्यातील शेतकरी या रेल्वेच्या लाभापासून वंचीत आहेत. ही किसान रेल्वे मराठवाड्यात कधी धावणार, असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकरी व नागरीक करत आहेत. लोकप्रतीनीधींनी प्रयत्न करून ही रेल्वे मराठवाड्यात आणावी, अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत.
मराठवाडा अद्यापही उपेक्षित-
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे किसान रेल्वे आहे. देशाच्या अनेक भागात ही रेल्वे सेवा सुरूही झाली आहे. शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, फुल वाहतूक देशातील मोठ्या शहरातील बाजारपेठेत कमी वेळात व कमी खर्चात करण्यात यावी, यासाठी किसान रेल ही योजना सुरू झाली आहे. रेल्वेच्या संदर्भात नेहमीच उपेक्षित राहिलेला मराठवाडा किसान रेल्वे बाबतीतही उपेक्षितच आहे.
तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल-
ही रेल्वे सुरू झाल्यास भाजीपाला, फळे व फुल वाहतुकीला फायदा होणार आहे. यात पैसा, वेळ याची बचत होवून शेतकऱ्यांना फायदा होईल. विशेषतः नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्हातील केळी उत्पादक व शेतकऱ्यांना होणार आहे.
देशात शंभरच्या वर किसान रेल्वे सेवा-
केंद्र सरकारने किसान रेल्वे ही योजना चार महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. काही दिवसांपुर्वी शंभरव्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. ही योजना पीपीपी योजनेतून राबविण्यात येते. माल वाहतुकसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात येते. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात नागपूर ते दिल्ली व देवळाली ते दानापूर (बिहार), या मार्गे किसान रेल्वे सुरू आहे.
जिल्ह्यातील शेतमालाची देशाच्या विविध भागात वाहतूक-
शेत मालाची वाहतूक, विक्री हा शेतीच्या उत्पन्नातील महत्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेला वाहतुकीमुळे नाशीवंत पिकांचे खुप मोठे नुकसान होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यात केळीची लागवड खूप मोठ्या क्षेत्रावर केली जाते. तसेच धर्माबाद येथे मिर्ची, मुदखेडला फुले तसेच या तिन्ही जिल्हा टरबूज,पपई, टमाटे वांगे यासह ईतर भाजीपाला पिके फळं उत्पादित केली जातात. हा उत्पादित केलेला शेत माल राज्यासह देशातील मोठ्या शहरात पाठविण्यात येतो.
पाच ते सात हजार टन केळीची होते ट्रकद्वारे वाहतूक-
जिल्ह्यासह परीसरातील केळीला देशभरात मोठी मागणी असते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव, हिंगोली मधील कळमनुरी, वसमत, परभणी पाथरी आदी भागातील केळी उत्तर व दक्षिण भारतातील मोठ्या शहरात जाते. तसेच विदेशातही पाठविली जाते. ही सर्व वाहतूक ट्रकने करण्यात येते. उत्तर भारतातील शहरात केळी पाठविण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. तर प्रती टन सुमारे चार ते हजार खर्च येतो शिवाय अपघात, मालाचे नुकसान होणे आदी धोके असतात.नांदेड पासून हे अंतर सुमारे दिड ते दोन हजार किलो मिटरचे आहे. या भागातील केळी काढणीचा हंगाम जून ते ऑक्टोंबर या काळात आसतो. याकाळात साधारणपणे दररोज पाचशे ट्रक मधून पाच ते सात हजार टन केळी राज्यासह देशभर पाठविण्यात येते. एका ट्रकला अंतराप्रमाणे 30 हजार ते 60 हजार लागते तसेच वाहतूकीसाठी तीन ते चार दिवस लागतात. यामुळे मालाची क्वालिटीला फटका बसतो. मराठवाड्याच्या दृष्टीने नांदेड -दिल्ली, नांदेड काश्मीर तसेच नांदेड कन्याकुमारी अशी किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
खासदार महोदय लक्ष्य देणार का?
देशभरात शंभरच्या वर रेल्वे सुरू झालेल्या असताना मात्र मराठवाड्यातील खासदारांनी याबाबतीत अद्याप पर्यंत तरी मागणी केल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच प्रशासकीय पातळीवरही तशा हालचाली नाहीत. शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना वाहतुकीत मोठी सवलत मिळत त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास दिड दिवसात वाहतूक खर्चात दहा ते विस हजाराची बचत प्रति ट्रक होणार आहे. याबाबतीत मराठवाड्यासह जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष्य घालून किसान रेल्वे साठी पाठपुरावा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत मुळे यांनी केली आहे.
हेही वाचा- गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल