नांदेड - सातत्याने पारंपरिक पिके घेतल्याने जमिनीचा पोत कमी होतो. तसेच उत्पन्न देखील कमी येऊ लागते. त्यामुळे नांदेडातील काही शेतकऱ्यांनी एक नवीन प्रयोग केला. देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल हजार एकर क्षेत्रात धने लागवड केली आहे. या धन्यांपासून मसाला उत्पादन देखील घेतले जाणार आहे.
वारंवार एकाच पिकांमुळे रोगाचा प्रादुर्भाव -
मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून एकच पीक घेतल्यामुळे पिकांना मर रोगाची लागण झाली होती. सततच्या पाणीवापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागल्याने पारंपरिक पिकांना पर्यायी पिक घेणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धने पीकाची लागवड केली.
या गावांतील शेतकऱ्यांनी केला प्रयोग-
देगलूर तालुक्यातील शहापूर, शेखापूर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मसाल्यात उपयोगी ठरणाऱ्या धने पिकाचे उत्पादन घेण्याचे ठरवले. त्यामुळे या वर्षी देलूर तालुक्यात प्रथमच हजार एकरावर धना पीक बहरू लागले आहे. देगलुर तालुक्यातील शहापुर, कोटेकल्लूर, लिंबा, रामपुर, शेखापुर, आलुर, करेमलकापुर व परिसरातील गावांमध्ये धने लागवड झाली आहे. तालुक्यातील या वर्षीची धने लागवड लक्षात घेता धन्यापासून पावडर बनवण्याचा प्रकल्पही या परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देखील मदत मिळणार आहे.
शेती आणि पिकांचा अभ्यास करून पीक लागवड करावी-
देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग त्यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पीक पद्धत बदलून नवीन पीके घेण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.