नांदेड – बँकांकडून पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पण, बँकांच्या विविध नियमांमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी येत आहेत. मोबाईलवर कर्ज माफीचा संदेश आला असेल, त्याच शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या अर्जासाठी बँकेत यावे, असे आवाहन हिमायतनगरच्या स्टेट बँकेने केले आहे.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 च्या यादीत आधारसह नाव नोंदविलेल्या व्यक्तींनाच कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्याचा संदेश येणार आहे. हा संदेश मिळताच शेतकऱ्यांना नवीन कर्ज मागणीचा अर्ज दिला जाणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत. त्यापैकी फक्त ५०० शेतकऱ्यांना मोबाईलवर कर्जमाफीचा संदेश आला आहे. अशाच शेतकऱ्यांना बँकेकडून नवीन कर्जासाठी अर्ज देण्यात येत आहेत.
पीक कर्जाचे १ जुलैपासून अर्ज स्वीकारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँक शाखेत मोठी गर्दी केली होती. त्यावेळी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र सिंह यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात कर्जमाफीच्या यादीत सर्वात जास्त हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना टोच नकाशा, फेरफार नक्कल, बँकांची बेबाकी लागणार नसल्याची त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक नसेल तर कर्ज माफ झाल्याचे त्यांना कळणार नाही. त्याकरीता मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेण्याची गरज असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. बँकेकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याकरीता प्रयत्नशील आहे. परंतु कोरोना संसर्गाचे दुष्परिणाम लक्षात घेता सर्वांनी काळजी घ्यावी व विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.