नांदेड - मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकरी नेहमीच विविध संकटाना सामोरे जात आला आहे. परंतु यंदाही त्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याच्याच डोळ्यादेखत वरूण राजाने हिरावून नेला. खरिपाच्या मुग व उडीद या पिकाच्या शेंगा तोडणीला आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पाऊसाने मूग, उडीद, पिकाच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड (अंकुर) आल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने तत्काळ पिकाची पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा मालेगाव व परिसरात सोयाबीन, मूग , उडीद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आर्थिक अडचणीत तो अगोदरच सापडल होता. दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला. परंतु मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकाच्या शेंगाना प्रत्यक्ष मोड फुटले असल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला असल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सदर विमा कंपनी व प्रशासनाचे अधिकारी यांनी त्वरित पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तत्काळ नुकसान भरपाई द्यावी -
यावर्षी आम्ही ओम शांती ऑर्गनिक फार्मर सेंद्रिय शेती गटातील सर्व शेतकऱ्यांनी एक एकर डाळवर्गीय पीक घेतले. छोट्या मुलाप्रमाणे सांभाळले. २-३ वेळा कोळपणी, खुरपणी, जीवामृत, दशपर्णी अर्काची ची फवारणी केली. मूग, उडीद पिकाला शेंगाही चांगल्या लागल्या व तोडणीला आल्यानंतर सतत पाऊस चालू असल्याने मुगाच्या शेगाला जाग्यावरच मोड (अंकुर )आले. शेंगा तोडणीसाठी मजूरही येत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेंगा खराब झाल्या आहेत. यंदा १ एकर मध्ये १ ते २ क्विंटल शेंगाही निघतील की नाही याचीही शाश्वती नाही. आम्ही पीकविमा भरला आहे. विमा कंपनी पंचनामा करायला तयार नाही. कृषी विभाग व प्रशासनाने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी भगवान इंगोले यांनी केली आहे.