नांदेड - नांदेडमध्ये दुष्काळी अनुदानातून कपात करणाऱ्या बँकेला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. शेतकऱ्यांना आलेल्या दुष्काळी अनुदानातून एक हजार रुपये खात्यात ठेवण बँकेने बंधनकारक केले होते. नवा मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील या कपातीला शेतकऱ्यांनी विरोध करत बँकेला कुलूप ठोकले. सध्या पेरणीचे दिवस असून आलेले सगळे पैसे द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून बँकेने आपली भूमिका नमती घेतली आहे.
अनुदानातून रक्कम केली जात होती कपात
अतिवृष्टी अनुदानाची रक्कम बँकेत जमा झालेली आहे. परंतु अनुदानातून हजार रुपयांची कपात करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यासाठीही बँकेत यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नवीन मोंढा येथील जिल्हा सहकारी बँकेचे शटरबंद करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोंडले. नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे अनुदान शासनाकडून जिल्हा बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहे. परंतु जिल्हा बँकेला अनेक गावे दत्तक नसताना शेतकऱ्यांना केवळ अनुदानासाठीच या बँकेचे खाते उघडावे लागतात. बहुतांश शेतकऱ्यांना नांदेडला येण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे रुपये खर्च करावा लागतो. त्यात एका फेरीत काम होईल याची शाश्वती नसते.
शासनाकडून 653 कोटी दुष्काळी अनुदान
शासनाकडून यंदा जवळपास ६५३ कोटी रुपये अनुदानाची रक्कम बँकेत जमा केली आहे. गतवर्षीदेखील हजार रुपयांची कपात केली होती. यंदादेखील हजार रुपये कपात करून उर्वरित अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यात काही शेतकऱ्यांना १४०० ते २००० रुपये अनुदान मिळाले आहे, अशा शेतकऱ्यांना हजार रुपये कपात करून चारशे ते हजार रुपये दिले जात आहेत. चारशे रुपये घेण्यासाठी दोनशे ते तीनशे रुपये तिकिटासाठी खर्च करणे परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात.
हेही वाचा -आजीने दिले दीड वर्षीय चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याने चटके, अखेर दुर्दैवी मृत्यू