नांदेड - शेतात होणारी सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून दिवशी बुद्रुक (ता.भोकर) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली आहे. संतोष कदम, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भोकर तालुक्यातील दिवशी येथील तरुण शेतकरी संतोष चोखोबा कदम (वय ३५ वर्ष) यांनी शेतात होणारी सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यांना कंटाळून रविवारी (दि.२१ जुलै) स्वतःच्या शेतात विषारी रसायन पिले. याची माहिती मिळताच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण, संतोष कदम यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई, असे कुटुंब आहे. कदम अल्पभूधारक असल्याने त्यांच्या शेतीमधून अत्यल्प उत्पादन होत असे. याप्रकरणी भोकर पत्नी संगीताबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.