नांदेड - जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांजरम येथे शेतात उघड्यावर असलेले बैल झाडाखाली बांधत असताना विज पडल्याने मांजरम येथील शेतकरी मारोती व्यंकटराव शिंदे (४२) व एक बैल जागीच ठार झाला. तर, १३ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या मांजरम शिवारात घडली. जखमी मुलावर नायगाव येथे प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवण्यात आले आहे.
मांजरम येथील शेतकरी मारोती व्यंकटराव शिंदे (४२) हे मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होते. पण, कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते सहकुटूंब गावाकडेच आले होते. सोमवारी काही कामानिमित्त नायगाव येथे आल्यानंतर दुपारी परत गावाकडे गेले. सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच पावसाची शक्यता होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारी शेतात सालगडी नसल्याने ते आपल्या लहान मुलाला घेऊन शेताकडे गेले होते. तेवढ्यात वादळी वारा व तुरळक पावसाच्या सरी आणि विजेचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे, शेतात उघड्यावर असलेले बैल झाडाखाली बांधण्यासाठी दोघे बाप लेक चालले असतांना विज पडली. या घटनेत शेतकरी मारोती शिंदे व त्यांचा बैल जागीच ठार झाले. तर, मुलगा कृष्णा शिंदे (१३) हा गंभीर जखमी झाला.
सदरची माहिती गावात समजल्यावर नातेवाईकांनी शेतात धाव घेवून जखमी कृष्णाला तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. तर, मारोती शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
आपल्याला उच्च शिक्षण मिळाले नाही, आपण शेतकरी झालो. परंतु, मुलांना उच्च शिक्षण मिळावे हे स्वप्न उराशी बाळगून नांदेड येथे मुलांच्या शिक्षणासाठी राहणाऱ्या मारोती शिंदे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.