नांदेड - कोरोनामुळे जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी बंद करण्यात आली होती. महानगरपालिका क्षेत्रातील तीन कार्यालय वगळता इतर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तांची नोंदणी शुक्रवार 8 मे 2020 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सहायक निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर हा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आला. परंतू स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार पुर्ववत सुरू करुन दस्त नोंदणी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश दिले होते. त्यानुसार मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयांना सूचना दिल्या.
दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्रमांक 1 व 2, दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय नांदेड क्र. 3 या तीन कार्यालयाचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केलेला आहे. या क्षेत्राचा प्रतिबंधित कालावधी पूर्ण झाल्यानंतर दस्तांची नोंदणी पूर्ववत सुरू होईल. येथील कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी जिल्हा मु्ख्यालयाच्या ठिकाणी ई स्टेट इनव्दारे व इतर ठिकाणी इ-स्टेप इन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर संपर्कसाधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. बुकींगसाठी प्रथम आलेल्यास प्रथम प्राधान्य (FIFO) या तत्वाचा अवलंब केला जाणार आहे. नागरीकांनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेलाच कार्यालयात यावे. दस्त छाननी, सादरीकरण झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुलीजबाब देण्यासाठी नावाच्या क्रमवारीनुसार प्रवेश मिळणार आहे. एका दस्तामध्ये जास्त पक्षकार असल्यास एकावेळी जास्तीत जास्त चारच पक्षकारांना प्रवेश मिळणार आहे.
पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेहऱ्यावरुन खाली घ्यावा. प्रत्येक दस्त नोंदणी व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सर्व दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील कर्मचाऱयांना मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर हे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्याचा वापर करण्यात यावा, अशा सूचना या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.