नांदेड - कोणतेही विद्यापीठ हे समाजासाठी रोल मॉडेलचे कार्य करते. विद्यापीठ हे शैक्षणीक विकासापुरतेच मर्यादित नसून सामाजिक विकास करण्याचे दायित्वही पार पाडते. अलीकडच्या काळात विद्यापीठाची सर्वांगीण प्रगती पाहता महाविद्यालयांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये जलपूजन समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले, की शास्त्रीय पद्धतीने विद्यापीठाने झाडांची लागवड केलेली आहे. कोणत्या भागात कोणती झाडे लावली म्हणजे त्याची वाढ व्यवस्थित होईल, याचा अभ्यास करून २५ हजार सागवानची वृक्षलागवड सामाजिक वनीकरणाच्या मदतीने करण्यात आली.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग
नांदेड येथील वनविभागाच्या मदतीने १० हेक्टरमध्ये जैवविविधता उद्यान उभारण्यात आले. दोन हजार झाडे येथील अधिकारी, कर्मचारी यांनी संगोपनाची जबाबदारी घेतली ही कौतुकास्पद बाब आहे. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे विद्यापीठाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
सर्वप्रथम विद्यापीठामध्ये यासर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. विद्यापीठामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला बारा साठवण तलावाची माहिती देऊन त्यापैकी एका तलावाचे जलपूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बराचसा विद्यापीठ परिसर पायी चालून, करण्यात आलेल्या कामांची इत्यंभूत माहिती घेतली आणि विद्यापीठ प्रशासनाचे कौतुक केले. याप्रसंगी अधिसभा सभागृहात मशीन ऑपरेटर गंगाधर डांगे आणि मिलिंद घोंगडे यांचा कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - 'भाजपने लोकशाहीला ठार मारण्याची सुपारी घेतली', रणदीप सुरजेवाला यांचे टिकास्त्र
अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले म्हणाले, की या विविध जलसंधारणाच्या कामामुळे विद्यापीठ परिसरामध्ये आजघडीला ४ कोटी लिटर पाणी साचले आहे. ते जमीनीत मुरत आहे, त्यामुळे विद्यापीठाच्या पाणीपातळीमध्ये खूप वाढ झाली आहे. यामुळे विद्यापीठाला पाण्याची कमतरता भासणार नाही. येथे उभारण्यात आलेल्या जैवविविधता औषधी वनस्पतींचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयोग होणार आहे.
शेवटी ते म्हणाले, अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा घेणे आणि पदवी देणे, एवढेच विद्यापीठाचे कर्तव्य नसून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, हासुद्धा आहे. आणि त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले हे होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर उपविभागीय वनअधिकारी डी.एस. पवार, उपविभागीय वनसंरक्षक के.पी. धुमाळ, उर्ध्व पेनगंगा कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.