नांदेड - जिल्ह्यात प्रत्येक गावातच तूर, हरभरा नोंदणी सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी स्वतः लक्ष घालत आहे. तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन तूर आणि हरभरा नोंदणी केंद्र गावातच सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. आज (मंगळवार) तूर आणि हरभरा खरेदी केंद्रावर भेट दिली असता काही मोजक्या शेतकऱ्यांशी अर्धापूर येथे ते संवाद साधत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले की, गावपातळीवर आपले सरकार केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांना गावातच तूर व हरभरा ऑनलाईन नोंदणी सुरू करून देण्यासाठी संबंधितांशी बोलून लवकरच याबाबत निर्णय होईल.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या गोडाउनात तूर, हरभरा खरेदी केंद्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, तालुका निबंधक ए.डी.चव्हाण, मुख्य लिपीक एस.एस.जळके, एस.बी.मंगनाळे, नांदेड फळे भाजीपाला खरेदी व विक्री संस्थेचे चेअरमन धर्मराज देशमुख, नगरपंचायत गटनेते अँड.किशोर देशमुख, नायब तहसीलदार मारोती जगताप, मंडळ अधिकारी संजय खिल्लारे, तलाठी रमेश गिरी, सचिव सुनेगावकर, भुजंग कसबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नांदेड फळे व भाजीपाला संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० हजार रुपये मदत -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आला. यावेळी चेअरमन धर्मराज देशमुख, कायदेशीर सल्लागार अॅड. किशोर देशमुख, अवधूत पाटील, सचिव सुनेगावकर आदींची उपस्थिती होती. यापूर्वीही धर्मराज देशमुख यांनी स्वखर्चातून पंतप्रधान केअर फंडला ५१ हजार रुपये मदत केली होती.