नांदेड - शहरातील गाडीपुरा भागात गोळी झाडून विक्कीचा खून केल्याची घटना २० जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी ८ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर १५ संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
शहर व जिल्ह्यात दोन टोळ्यात संघर्ष
शहर व जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेत मोठी वाढ होत असून २० जुलै रोजी दोन टोळ्यांमध्ये पुन्हा संघर्ष पेटला. दरम्यान गाडीपुरा भागात मोटारसायकलवर आलेल्या ५ जणांनी संगणमत करून विक्की ठाकूर याच्यावर तलवारीने वार करुन डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे विक्कीचा जागेवरच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे परिसरात चांगलेच दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर मोरे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे व फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, यातील आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून जुन्या वादावरुन तसेच विक्की चव्हाण याच्या खूनाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये म्हणून मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी गाडीपुरा भागात विक्की ठाकूर व त्याच्यासोबतचा सुरज खिराडे या दोघांचा पाठलाग केला. त्यानंतर विक्कीच्या मानेवर तलवारीने वार करुन डोक्यात गोळी झाडून ठार केल्याची फिर्याद सुरज खिराडे यांनी दिली. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी नितीन बिघानीया, दिगंबर काकडे, मुंजाजी उर्फ गव्या धोंगडे, लक्की मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे, कैलास जगदिश बिघानिया, अंजली नितीन बिघानीया व ज्योती बिघानीया या ८ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून यामध्ये समावेश असलेला जगदिश बिघानीया हा सध्या विक्की चव्हाण खून प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान खून प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत.
हेही वाचा - Rain Alert : आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता