नांदेड- पड रे पाण्या.. पड रे पाण्या.. कर पाणी पाणी...!, शेत माझं लई तहानलं चातकावानी...! अशी आर्त हाक जिल्ह्यातील बळीराजा पावसाला देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरीही जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. आतापर्यंत केवळ सरासरीच्या दहा टक्केच पाऊस झाला आहे.
राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना केवळ नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मृग व आद्र नक्षत्रात पावसाने हजेरी लावली नाही. शनिवारी ६ जुलै रोजी पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले आहे.
पावसाळ्याची सुरुवात होऊन एक महिना उलटला. तरी सरासरीच्या १० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी पेरणीसह भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागासह नांदेड शहरात पाण्यासाठी प्रशासनाला टँकरची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात अजूनही १५६ टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ नागरीकांसाठी व प्रशासनासाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे.
सर्व साधारणपणे रोहिणी आणि मृग नक्षत्रात पावसाळ्याला सुरुवात होते. मृग निघाला की मुग, उडीद, तूर या खरीप पिकांची पेरणी केली जाते. या काळात या पिकांची पेरणी झाली तरच उत्पन्न चांगले होते. सध्या पावसाने एक महिना खंड दिल्याने या काळात घेण्यात येणाऱ्या पिकांची पेरणी शक्य नाही. आता शेतकरी उत्पन्नासाठी सोयाबीन व तूर या पिकांवर अवलंबून आहे. मात्र, तेही कोरडे गेल्यास शेतकऱ्यांच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणीचे संकट
पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, ती वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना बियाने उपलब्ध करून देण्यास कृषी विभागाने आतापर्यंत कोणतीच तयारी केली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात बियाण्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.