नांदेड : खूनाच्या घटनेत कचरा वेचू नको, आपली इज्जत जाते असे म्हणत शहरातील सांगवी भागातील अंबानगर येथे एकाने कचरा वेचणाऱ्या मजूरासोबत वाद घातला. यात त्याने मजूराला लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत त्या मजूराचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अंबानगर येथील संदीप रघुनाथ चौंदते हा कचरा वेचण्याचे काम करतो. दुपारच्या सुमारास तो काम करत असताना प्रमोद जोंधळे हा त्याच्या जवळ आला आणि तु कचरा का गोळा करतो समाजात आपली इज्जत घालवत आहेस त्यामुळे हे काम सोडूनदे म्हणत त्याने वाद घातला.
यावेळी चौदंते याने कचरा करण्याचे काम हे पोटापाण्यासाठी करत असून ते सोडणार नाही असे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. त्यातून प्रमोद जोंधळे याने संदीप चौदंते याला लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चौदंते याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, घटनेनंतर आरोपी प्रमोद जोंधळे फरार झाला असून पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.
दुसऱ्या घटनेत एका दारूड्याच्या आई, वडलांनी मुलाच्या व्यसनाला कंटाळून सुनेला माहेरी नेऊन सोडले. ते तीला वापस आणा असा तगादा वारंवार लावत होता. आई- वडील बायकोला परत आणत नसल्याचा राग मनात धरून मुलाने घरातील पिण्याच्या पाण्यात विष टाकले. आई- वडील अन् भावाला संपविण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले. या प्रकरणात लिंबगाव पोलिस ठाण्यात दारुड्या मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माधव दिगांबर बोकारे (३०, रा. राहाटी) असे दारुड्या मुलाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे वडील दिगांबर बोकारे आणि त्यांच्या पत्नीने त्याच्या बायकोला माहेरी नेऊन सोडले होते. त्यामुळे माधव अस्वस्थ होता. २५ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास माधवने आई वडिलांना माझ्या बायकोला परत घेऊन या, असे सांगितले. त्यावर आई-वडिलांनी जोपर्यंत तू दारू सोडत नाहीस, तोपर्यंत तुझ्या बायकोला परत आणणार नसल्याचे सुनावले.
त्यामुळे माधवचा राग अनावर झाला. त्यातूनच त्याने आई-वडील अन् भावाचा काटा काढण्याचे ठरविले, त्यांना पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या भांड्यात विष टाकले. तसेच माझ्याबाबत कुठे तक्रार केल्यास दुसरी मुले आणून जिवंत मारतो, अशी फोनवरून धमकी दिली. या प्रकरणात दिगांबर बोकारे यांच्या तक्रारीवरून मुलगा माधव बोकारे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पोउपनि केजगीर हे करीत आहेत.