नांदेड - माहूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून आज दिवसभरात आठ जणांचे लचके तोडले. याच कुत्र्याने एका गाईवर सुद्धा हल्ला केला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगरच्या पाठीमागील तहसील रोड व ग्रामीण रुग्णालय परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ लोकांना चावा घेतला. यात सृष्टी शामराव राकडे (रा गोंडवडसा, ६ वर्षे), तनुजा राम जयस्वाल (३ वर्षे) ,धनराज सीताराम बाभुलकर (३ वर्षे) या तीन लहान मुलांसह बाबु धनू राठोड( वय ६६ वर्षे), जय किशोर तेल्हारे(वय २० वर्षे, सर्व रा. माहूर) याचा समावेश आहे. त्यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. मोरे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले.
हेही वाचा - इगतपुरीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; दोन महिन्यांत १०७ नागरिकांचा घेतला चावा
या व्यतिरिक्त ही तीन लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने येथील युवकच कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी एकवटले आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.