नांदेड - जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दणका दिला आहे. एका ग्राहक महिलेने बँकेकडे मुदत ठेवीच्या रुपात जमा केलेल्या पैशांपैकी ७६ हजार १३५ रूपये १२ मार्च २०१९ पासून ९ टक्के व्याजासह एका महिन्याच्या आत परत करावे, ग्राहक महिलेला दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल ३ हजार रूपये तसेच दाव्याची रक्कम म्हणून २ हजार रूपये महिन्यात परत करावेत, असे आदेश दिले आहेत.
नांदेड शहरातील तरोडा बु.येथील अनिता संभाजी बुरगुलवार यांनी १८ जुलै, २००१ला १५ हजार रूपये १७ वर्षे ६ महिने कालावधीसाठी मुदत ठेवीच्या स्वरूपात जमा केले होते. त्यांना १८ जानेवारी, २०१९ ला या ठेवीवरील व्याजासह १ लाख ५३ हजार १३५ रूपये मिळणार होते. अनिता बुरगुलवार यांनी मुलाच्या शिक्षणासाठी ही रक्कम उपयोगी पडेल यासाठी मुदत ठेवीच्या रुपात १५ हजार रूपये जमा केले होते. मुदत संपल्यानंतर बँकेने ११ फेब्रुवारी, २०१९ रोजी अनिता बुरगुलवार यांच्या खात्यात १ लाख ५३ हजार १३५ रूपयांच्या ऐवजी फक्त ७७ हजार रूपये जमा केले.
उर्वरीत ७६ हजार १३५ रूपये दिलेच नाहीत. त्यामुळे ग्राहक अनिता बुरगुलवार यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी अॅड. शलाका
ढमढेरे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच नांदेड येथे जिल्हा बँकेविरुद्ध दावा दाखल करून ७६ हजार १३५ रूपये १८ जानेवारी, २००१ पासून बँकेने १८ टक्के व्याजाने द्यावेत. तसेच ग्राहक बुरगुलवार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी
३० हजार रूपये व दाव्याचा खर्च म्हणून १० हजार रूपये द्यावेत, अशी मागणी केली.
ग्राहक मंचाने या प्रकरणी जिल्हा बँकेला नोटीस पाठवून बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा बँकेमार्फत अॅड. एम.व्ही. वानखेडे यांनी बाजू मांडली. त्यामध्ये ३० जानेवारी, २०१० रोजी झालेल्या प्रशासकीय मंडळाच्या सभेतील ठरावानुसार बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ठेवी प्रमाणे व्याज आकारण्यात येणार नाही. सर्वांनी ते मान्य केले आहे, असे सांगितले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर, सदस्या कविता देशमुख, सदस्य रवींद्र बिलोलीकर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन कागदपत्र तपासून अनिता बुरगुलवार यांची तक्रार अंशतः मंजूर केली. जिल्हा बँकेने त्यांना ७६ हजार १३५ रूपये १२ मार्च १९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याजाने एका महिन्याच्या आत द्यावेत. तसेच ग्राहक बुरगुलवार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ३ हजार रूपये व द्याव्यांचा खर्च म्हणून हजार रूपये असे एकूण ५ हजार रूपये एका महिन्याच्या आत द्यावेत असे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा बँकेत मुदत ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.