नांदेड - आशावर्कर अतिशय कमी मानधनावर कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कुठलाही प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे त्या अडचणीत आहेत. त्यांची गरज लक्षात घेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने अर्धापूर तालुक्यातील आशा वर्कर्सला धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
आशा वर्कर गावातील गरोदर माता व अन्य बरेच रुग्ण घेऊन आरोग्य केंद्रात जातात. कोरोनामुळे त्यांच्या कामाचा व्याप वाढला असून गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागत आहे. मात्र, मानधन प्रतिदिवसाला 32 रुपये इतकेच मिळते. एकीकडे रोजगार हमीवर 200 रुपयांच्यावर मजुरी मिळत असताना आशा वर्कर्सला 32 रुपयांवर दिवस काढावा लागत आहे.
कोरोनासारख्या महामारीत गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मात्र, शासनाकडून साधे मास्क किंवा सॅनिटायझर सुद्धा देण्यात आले नाही, अशी खंत आशा वर्करने व्यक्त केली. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी तत्काळ धान्याच्या किट पाठवल्या. अर्धापूर पंचायत समिती येथे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती डॉ.लक्ष्मणराव इंगोले, भाजप युवा नेते अॅड. किशोर देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, नांदेड बाजार समितीचे माजी संचालक निलेश देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, विराज देशमुख, शहराध्यक्ष विलास साबळे, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर यांच्यासह भाजप कार्यकर्ते व आशा वर्कर उपस्थित होत्या.