नांदेड - दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या असलेल्या तीर्थक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेवर यंदा कोरोना संसर्गाचे व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट आहे. शासनाच्या सूचना आणि निर्देशानुसार यात्रा भरवता येणार का? या बाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. अंतिम निर्णय घेण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदेमध्ये बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे .
येथील बाजार देशभरात प्रसिध्द -
जिल्ह्यातील माळेगाव (ता. लोहा) येथील श्री खंडोबाच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येत असतात. या यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जाते. यात्रेत भरणारा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. विविध प्राण्याची येथे मोठी खरेदी-विक्री होते. किमान महिनाभरापासून यात्रेच्या नियोजनाची लगबग सुरु असते. देशभरातील व्यापारीसुद्धा माळेगावच्या दिशेने कूच करत असतात.
शासनाच्या निर्णयाकडे भक्तांचे लक्ष्य -
शासनाने अनेक ठिकाणच्या यात्रेस परवानगी नाकारल्याची उदाहरणे या सर्व पार्श्वभूमीवर माळेगाव यात्रेच्या अनुषंगाने काय निर्णय घेतला जातो याकडे भाविक भक्तांचे लक्ष लागले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन माळेगाव येथील श्री. खंडोबाची यात्रा भरली जावी, असे भाविकांना वाटणे सहाजिक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे प्रशासन आणि पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात ? हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.
दरवर्षी 15 दिवस असते यात्रा -
देशभरातून भाविकांची गर्दी आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या दि. ११ जानेवारीपासून माळेगाव यात्रेला सुरुवात होत आहे. दरवर्षी १५ दिवस ही यात्रा भरत असल्यामुळे विविध साहित्य, वस्तू विक्री करणारे व्यापारी या ठिकाणी तळ ठोकून असतात .