नांदेड : नांदेडमध्ये गुन्हेगारी, खून असे प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असेच एक गंभीर प्रकरण नव्याने समोर आले आहे. गुरुवारी रात्री बोंढार हवेली गावात एका लग्नाची वरात सुरु होती. यावेळी मयत अक्षय भालेराव आणि त्याचा भाऊ आकाश भालेराव हे दोघ किराणा सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते. दुकानासमोर वरात येताच आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच तुझे वरातीत काय काम आहे? असे म्हणत अक्षय याच्यावर हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी पोटात चाकू भोसकून अक्षयचा खून केला.
दोन्ही गटांत दगदफेक : यात अक्षयच्या भावावरही वार करण्यात आले. अक्षयची आई सोडवण्यासाठी गेली असता तिलाही मारण्यात आले, असा आरोप अक्षयच्या परिवारातील सदस्यांनी लावला आहे. घटनेनंतर दोन्ही गटांत दगदफेक करण्यात आली. गावामध्ये भीमजयंती काढल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी अक्षयची हत्या केली, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान आकाश भालेराव यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिसांनी संतोष संजय तिडके, कृष्णा गोविंद तिडके, नीलकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके यासह एकूण ९ जणांविरोधात हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय दबाव आणत असल्याचे आरोप : या प्रकरणी अटक असलेल्या आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान फरार असलेल्या दोन आरोपीचा पोलीस शोध सुरु असल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी दिली. या घटनेनंतर युवा पँथरने पत्रकार परिषद घेवून शिवसेना शिंदे गट यांचे जिल्हाध्यक्ष आनंद बोंढारकर हे राजकीय दबाव आणत असल्याचे आरोप केले आहेत. गावातील अत्याचाराच्या घटना समोर येवू देत नव्हते, असे गंभीर आरोप पोलिसांवर व राज्यकर्त्यांवर राहुल प्रधान यांनी लावले आहेत.
सुजाण आंबेडकर यांचे ट्विट : ही घटना समोर आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाण आंबेडकर यांनी ट्विट केले. शनिवारी अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यात आला. त्यामागे गावामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केल्याचा राग गावातल्या तथा कथित उच्च वर्णीयांना होता. याच कारणाने अक्षयची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करतो, अशा स्वरूपात त्यांनी ट्विट केले आहे.
बोढार गावाला छावणीचे स्वरूप : वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजान आंबेडकर यांचे हे ट्विट आहे. अक्षय हा ग्राम शाखेचा पदाधिकारी होता, असेही सुजाण आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नांदेडमधील प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. गुन्हेगारांना जागा दाखवायला हवी, ही घटना अत्यंत निंदनीय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पोलिसांकडून बोढार गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
हेही वाचा :