नांदेड - बहुचर्चित धान्य घोटाळ्यात अटकेत असलेल्या दोन अव्वल कारकुन व गोदामपालांचा जामीन नायगाव न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात कंपनीच्या मालकांसह आठ जण कारागृहात बंद आहेत. दुसरीकडे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी व तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्वसाठी अर्ज दिला आहे.
त्यांच्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. पण सीआयडीचा 'से' रिपोर्ट नसल्यामुळे लांबणीवर पडली आहे. नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शासकीय वितरणचा धान्यसाठा १८ जुले २०१८ ला कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनीत जाताना छापा टाकून पकडला होता. पोलिसांच्या कारवाईला चुकीचे दाखवत कंपनीमालक अजय बाहेती आणि इतर आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नुरुल हसन हे करत होते. मात्र, हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला.
नऊ महिन्यांनंतर या प्रकरणात सीआयडीची उच्च न्यायालयाने कानउघाडणी करताच अजय बाहेती, जयप्रकाश तोगड़िया, राजू पारसेवार आणि ललीत खुराणा यांना अटक करण्यात आली.यानंतर पुरवठा विभागातील अव्वल कारकून रमेश भालचंद्र भोसले, रत्नाकर नारायण ठाकूर, यांच्यासह सहा जणांना अटक केली. हे आठही जण सध्या हसूल कारागृहात आहेत. दरम्यान, अव्वल कारकून व गोदामपाल यांचा नायगाव न्यायालयाने मंगळवारी जामीन फेटाळला. दुसरीकडे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बिलोली जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.
त्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, सीआयडीचे म्हणणे 'से' रिपोर्ट आला नसल्याने बुधवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. विजय शिंदे यांनीही बिलोली न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असल्याचे तपास अंमलदार पोलीस उपअधीक्षक आय के. पठाण, नांदेडचे रामलिंग स्वामी यांनी महिती दिली.