नांदेड - कोट्यवधी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वेणीकर यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती. मात्र, बिलोलीच्या न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
धान्य घोटाळ्याचा तपास सीआयडी करत असून आता सीआयडी निवासी जिल्हाधिकारी वेणीकरला कधीही अटक करू शकते. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वेणीकर हे सुट्टीवर असून नुकतीच त्यांनी आपली सुट्टी वाढवल्याचे कळत आहे. वेणीकर यांच्या काळात अशाच प्रकारचा धान्य घोटाळा परभणीतही झाला होता, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आरेफ पठाण यांनी न्यायालयात केली होती. त्यावर हा निकाल देण्यात आला आहे.
याप्रकरणी आज अशोक चव्हाण यांनी भाष्य करत जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढल्याची टीका केली. आता वेणीकर यांना जामीन नाकारल्यानंतर या धान्य घोटाळ्यातील आणखी काही बडे मासे गळाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.