नांदेड - शेतीवर काढलेल्या कर्जाच्या वादातून पत्नीला बेदम मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार मारल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील पांगरा येथे घडली होती. या प्रकरणी आरोपी पतीला येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संदीप माणिकराव सूर्यवंशी असे आरोपी पतीचे नाव आहे.
कर्जाच्या पैशावरुन झाला वाद - कंधार तालुक्यातील पांगरा (तळ्याचा) येथील राहणारा संदीप माणिकराव सूर्यवंशी (३५) हा आपली पत्नी यशोदा (३०) आणि एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह किरायाने राहत होते. संदिपने आपल्या शेतीवर ५० हजार रुपये कर्ज काढले होते. परंतु त्या कर्जाच्या पैशाचे काय केले, असा जबा यशोदा या त्याला नेहमी विचारात होत्या. यातून या दोघांचा वाद होत असे. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलगी शाळेत गेल्याने मुलगा घरी होता. संदीप सूर्यवंशीने त्याला पाच रुपये देऊन खाऊ आणण्यासाठी दुकानावर पाठवले. यानंतर त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
आरोपी पतीही भाजला होता - यात यशोदा ७० टक्के भाजली. आईच्या ओरडण्याचा आवाज येताच दुकानावर गेलेला मुलगा धावत घरी आला. त्यानेही प्रत्यक्ष पाहिले. आईला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे हात भाजले होते. दि. २२ नोव्हेंबरच्या रात्री उपचारादरम्यान यशोदा संदीप सूर्यवंशी (३०) यांचा विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाने ठोठावली जन्मठेप - या घटनेत पोलिसांनी आरोपी संदीप सूर्यवंशी याला अटक केली. तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात १२ साक्षीदार तपासले. या प्रकरणात मृत यशोदाचा सात वर्षाचा मुलगा सचिन याची साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय अहवाल तसेच जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगावकर यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी संदीप सूर्यवंशी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार जदार शेख जावेद यांनी केला होता.