नांदेड - बिलोली तालुक्यातील सावळी येथील एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बिलोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सावळी येथील पीडित महिला जळण (सरपण) आणण्यासाठी १९ मार्च २०१३ रोजी सायंकाळी एकटीच रानात गेली होती. त्यावेळी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन दिलीप देवकर याने तिचे तोंड साडीच्या पदराने बांधून जवळच्या शेतात नेले. त्यानंतर तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन बिलोली पोलीस ठाण्यात देवकरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजेंद्र रणवीरकर यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणात ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बिलोली जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.के मांडे यांनी आरोपी दिलीप देवकरेला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस कैद अशी अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.