नांदेड - कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांकडून मक्याचा उठाव होत नाही. त्यामुळे अप्पारापेठ शेत शिवारात तब्बल १६ हजार किंटल मका उघड्यावर पडून आहे. दिवसरात्र मेहनत करून पिकवलेला मका उघड्यावरच पडलेला पाहून बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सिमेलगत असलेल्या किनवट तालुक्यातील अनेक गावात हे चित्र पहायला मिळत आहे.
हेही वाचा... पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा
किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. तेलंगणा राज्यातील अदिलाबाद, निर्मल, निजामबाद, आणि नागपूर येथील मोठ मोठे व्यापारी या भागात येऊन मक्याची खरेदी करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असल्याने या मक्याला व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नाही. त्यामुळे आप्पारापेठ शिवारात चारशे एकर शेतीत शेतकऱ्यांना पिकवलेला १६ हजार क्विंटल मका उघड्यावरच पडून आहे.