नांदेड - देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना, प्रमुख नेत्यांचे सहकार्य रहावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
हेही वाचा... विशेष : ‘लॉकडाऊन’मुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योग मृत्यूशय्येवर !
देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्व आंबेडकर अनुयायी व सर्व संघटनांच्या नेत्यांना व जनतेला यंदाची भिमजयंती सार्वजनिक साजरी न करण्याचे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. सर्वांनी १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आपापल्या घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून कोरोना या संकटाला पसरवू न देण्याचा अवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.