नांदेड - माळेगाव यात्रा कुस्त्यांच्या 'दंगली'साठी प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षीची यात्रा ही दाजी-भावजींच्या कुरघोडीने गाजली. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आमदार शामसुंदर शिंदे आणि खासदार चिखलीकर समर्थक नगरसेवक शरद पवार यांच्यात धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार कुस्त्यांच्या मैदानातच घडला.
हेही वाचा - भारतातील सर्वात मोठ्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात, देशभरातून भाविक दाखल
माळेगाव यात्रेत महाराष्ट्रासह शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणावर मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येतात. हजारोंची बक्षीसे देखील घेऊन जातात. मात्र, यावर्षीची यात्रा जिल्ह्यातील खेळाडूंनीच गाजवली असून तीही कुस्तीच्या आखाड्यातच. खासदार चिखलीकरांचे कार्यकर्ते आणि कंधार लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे आणि चिखलीकर यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. शिंदे यांनी चिखलीकरांना सोडचिट्ठी देत 'एकला चलोरे'ची भूमिका निवडणुकीत घेतली होती.
गुरुवारी माळेगाव येथे कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, कार्यकर्त्यांनी चिखलीकर यांच्या शिवाय उद्घाटन होणार नाही, अशी भूमिका घेतली. शिंदे यांना डावलत चिखलीकर यांनी नारळ फोडला आणि तिथून निघून गेले. कार्यक्रमादरम्यान शिंदे यांना लोह्याचे नगरसेवक तथा भाजपचे तालुका अध्यक्ष शरद पवार यांच्यात बाचाबाची झाली. एव्हढेच नाहीतर दोघात धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर आमदार शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत निघून गेले. यामुळे माळेगावात मातीतल्या मल्लापेक्षा पांढऱ्या कपड्यातील मल्लांची कुस्ती चर्चेचा विषय ठरली आहे. यात्रेतील पुढील दोन दिवस देखील खासदार चिखलीकर आणि आमदार शिंदे यांच्यातील वाद चिघळण्याची चर्चा आहे.
हेही वाचा - वलघ्या... वलघ्या...च्या गजरात शेतकऱ्यांनी केली वेळ अमावस्या साजरी