नांदेड - शासकीय रुग्णालयात असलेल्या आरोग्य सुविधा हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयातही उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. शहराच्या देगलुर नाका हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका, एक्स-रे व सोनोग्राफी मशीन अशा वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
'आवश्यकतेनुसार आणखी अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ'
यावेळी पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, की या भागातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात जाण्यापेक्षा त्यांना सुविधा हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णवाहिका, एक्स-रे व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
'हज यात्रेकरू साठी विमान सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा'
आरोग्य, शिक्षण व मूलभूत सोयीसुविधा नांदेडकरांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच हज यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरुंसाठी विमानसेवा असावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही, असे ते म्हणाले.